मीनाकुमारीच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त

मीनाकुमारीच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त

मीनाकुमारीच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)

हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय सात्विक व शालीन सोंदर्य असलेली व अभिनयाची असामान्य प्रतिभा असलेली अभिनेत्री म्हणून मीनाकुमारी यांनी आपला ठसा उमटवला आहे.१ ऑगस्ट१९३३ रोजी मुंबईत जन्मलेल्या मीनाकुमारी यांना अवघ्या एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं.अर्थात काहींनी त्यांच जन्मसाल असही लिहिलंय.३१ मार्च १९७२ रोजी त्या मुंबईतच कालवश झाल्या. त्यांचे उर्दू भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी लिहिलल्या गझला व कविता संग्रह रुपाने प्रसिद्ध आहेत.’नाझ ‘ या टोपणनावाने त्या लिहीत.

आगाज तो होता हे अंजाम नही होता
जब मेरी कहानी मे वो नाम नही होता..

जब जुल्फ की कालीख मे घुल जाये कोई राही
बदनाम सही लेकिन गुमनाम नही होता..

हस हस के जवां दिल के हम क्यू नही चुने तुकडे
हर शख्स की किस्मत मे ईनाम नही होता ..

बहते हुए आसु ने आंखो से कहा थमकर
जो मय से पिघल जाये वो जाम नही होता ..

दिन डूबे है डूबे बारात लिये कशती
साहिल पे मगर कोई कोहराम नही होता..

अशी गझल लिहिणाऱ्या मीनाकुमारी यांचे खरे नाव महजबीन होते. विजय भट्ट यांनी त्यांचे चित्रपटाकरता मीनाकुमारी हे नामकरण केले. मीनाकुमारी यांचे वडील अली बक्ष कवी आणि हार्मोनियमवादक होते. त्यांच्या आईचे नाव इकबाल बेगम होते.घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे मीनाकुमारीनी बालवयातच चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. वयाच्या पाचव्या वर्षी त्या ‘बेबी मीना ‘ नावाने ‘लेदर फेस ‘ ( १९३८ ) या चित्रपटाचा चमकल्या. त्यांच्या मृत्युनंतर१९७३ साली ‘ गोमती के किनारे ‘ हा त्यांचा अखेरचा चित्रपट प्रदर्शित झाला. म्हणजे एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यातील पस्तीस वर्षे मीनाकुमारी हिंदी चित्रपट सृष्टीत राहिल्या. एका अर्थाने त्यांचे संपूर्ण आयुष्यच चित्रपटीय होते.

प्रारंभीच्या काळात अनेक काल्पनिक, पौराणिक चित्रपटात त्यांनीं काम केले. अलाउद्दीन और जादुई चिराग, हनुमान पाताल विजय, लक्ष्मीनारायण ,श्री गणेश महिमा ,नौलखा हार आदी चित्रपटात त्या दिसल्या.

तुकडे तुकडे दिन बीता,धज्जी धज्जी रात मिली
जिसका जितना आंचल था ,उतनी ही सौगात मिली..

रिमझिम रिमझिम बुंदो मे जहर भी है और अमृत भी
आखे हसके दी ,दिल रोया,यह अच्छी बरसात मिली..

अस लिहीणाऱ्या मीनाकुमारी यांना ‘ परिणीता ‘ या बिमल रॉय यांच्या आणि ‘बैजू बावरा ‘या भट्ट बंधूंच्या चित्रपटांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका बनविले. दिग्दर्शक कमल अमरोही त्यांच्याशी त्यांची मैत्री झाली.वास्तविक कमाल अमरोही विवाहित होते.तरीही या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन ते विवाहबद्ध झाले. पण हा विवाह मीनाकुमारी यांना सुखदायी ठरला नाही.कमाल अमरोहीना आपल्या कवी मनाच्या प्रतिभावंत व अव्वल दर्जाची कलावंत असलेला पत्नीची मन ओळखता आले नाही.स्वतः दिग्दर्शक असूनही तिच्यातील कलाकार त्यांना समजला नाही. ते एक कलाकार म्हणून असलेल्या तिच्या चित्रपट निवडीच्या स्वातंत्र्यावरही गदा आणू लागले.बंधने लादू लागले. त्याकाळच्या अनेक महत्त्वाच्या व नंतर गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिकेसाठी विचारणा होऊनही मीनाकुमारीना त्यांनी काम करू दिले नाही.त्यातून मीनाकुमारी यांची घुसमट वाढत गेली.मानसिक, भावनिक पातळीवर त्या दुखावल्या गेल्या.परिणामी १९६४ साली मीनाकुमारी व कमाल अमरोही यांचा घटस्फोट झाला.

वयाच्या पस्तिशीत त्या पतीच्या पुरुषी अहंकारी जाचातून सुटल्या.पण त्या मद्यपाशात अडकल्या.कमाल अमरोही यांच्या मते ,मी तिला घराबाहेर काढले नाही.तिला स्वच्छंदी जीवनाची ओढ लागली असावी.ती स्वैर वागत असे.पण तरीही हे सारे त्या कलावंत म्हणून सहन करू शकल्या नाहीत.नैराश्य, एकाकीपण त्या पेलू शकल्या नाहीत.त्या मद्याच्या आहारी गेल्या. आणि त्यामध्ये त्यांचा अकाली अंतही झाला.लिव्हर सोरायसिस हा आजार त्यांना झाला.लंडनला उपचार करून आल्या तरी त्या वाचू शकल्या नाहीत.मीनाकुमारी आणखी वीस तीस वर्षे जगल्या असत्या तर भारतीय चित्रपटसृष्टीत व उर्दू कवितेतही त्यांनी आणखी अनमोल स्वरूपाची भर घातली असती.कोणत्याही कलावंताला,प्रतिभावंताला समजून घेणारा जीवनसाथी नसेल अथवा तो स्वतःला सांभाळणारा नसेल तर त्यामुळे होणाऱ्या होरपळीतून केवळ तो कलाकार लौकर संपत नसतो तर फार मोठी सामाजिक संस्कृतीक हानीही होत असते.

हां, कोई और होगा तुने जो देखा होगा
हम नही आगसे बच बचके गुजरने वाले…..

इतना कहकर बीत गई हर थंडी भिगी रात
सुख के लम्हे ,दुःख के साथी ,तेरे खाली हात..

असे लिहिणार्‍या मीनाकुमारी यांनी दिल एक मंदिर,दिल आपना प्रीत परायी,सहिब बिवी और गुलाम,मेरे अपने,कोहिनुर,आरती,भाभी की चुडिया, चित्रलेखा,भिगी रात,काजल, आझाद,सहारा,चिराग कहा रोशनी कहा,मै चूप र रहुंगी, फुल और पत्थर,बहु बेगम,नूर जहाँ ,पाकिझा,दुष्मन, आदी अनेक चित्रपटातुन आपल्या प्रभावी अभिनयाचे दर्शन घडविले.त्यांची संवादफेक,बोलके डोळे केवळ अप्रतिम होती.त्या उत्तम नर्तिका होत्या.त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.पडद्यावरची ट्रॅजीडी क्वीन म्हणून त्या ओळखल्या गेल्या.

मीनाकुमारी कवितेतून,गझलेतून व्यक्त होत राहिल्या.’गुलजार ‘ यांचा मीनाकुमारीवरील ‘चंद्रास्त ‘ हा लेख अरुणा अंतरकर यांनी शब्दांकित केला आहे. त्यात गुलजार म्हणतात, ” कविता म्हणजे घायाळ हृदयाचा उद्गार असतो. काळजात जपून ठेवलेला हुंदका कवितेच्या रुपाने प्रगट होत असतो.कवितेची ही व्याख्या मीनाजींपेक्षा कुणालाही समर्पकपणे लागू पडत नसेल. त्या स्वतःच एक कविता होत्या. एकाच वाक्यात वर्णन करायचं तर मी म्हणेन, ‘वे सर से पांव तक बस्स एक दिल थी !’. त्यांच्या अंतकरणाची श्रीमंती त्यांच्या नम्र, निगर्वी वर्तनात दिसायची आणि त्यांच्या अंतःकरणातील वेदना त्यांच्या कवितेत दर्शन द्यायची.’

अतिशय तल्लख बुद्धी आणि अभ्यासू असलेल्या मीनाकुमारी यांना परिपूर्णतेचा ध्यास होता. आपल्या कविता,गझलाही तंत्राच्या दृष्टीने परिपूर्ण असाव्यात म्हणून त्या आपल्या कविता गुलजार व कैफी आझमी यांना दाखवायच्या.

हां, बात कुछ और थी,कुछ औरही बात हो गई
और आंख ही आंख मे तमाम रात हो गई
—–
जिंदगी क्या है, कभी सोचने लगता है यह जहन
और फिर रूह पे छा जाते है
दर्द के साये ,उदासी सा धुवां,दुख की घटा
दिल मे रह रहके है ख्याल आता है

जिंदगी यह है तो फिर मौत किसे कहते है..

सब तुमको बुलाते है ,पलभर को तुम आ जाओ

बंद होती मेरी आखो मे मोहब्बत काइक खांब सजाओ…

मिल गया होगा अगर कोई सूनहरी पत्थर
अपना टूटा हुआ दिल याद तो आया होगा

खून के छिटे कही पोछ न ले रांहो से
किसने विराने को गुलजार बनाया होगा..

अशा कविता स्वतः लिहिणाऱ्या मीनाकुमारी युही कोई मिल गया था सरे राह चलते चलते, अजीब दासता है ये कहाँ शुरू कहाँ खतम,इनही लोगो ने ले लिना दुपट्टा मेरा,आज की रात वो आए है बडी देरके बाद-थाडे रहियो ओ बांके यार रे, ये रात ये खामोशी , कितना हसी है मौसम कितना हसी असर है, जारी जारी ओ कारी बदरिया,राधा ना बोले ना बोले ना बोले रे,अशा असंख्य गाण्यांतून आपल्याला पडद्यावर दिसत राहतात, त्या काळाच्या पडद्यावरून जाऊन पन्नास वर्षे झाली तरीही. वर उल्लेखलेल्या लेखात गुलजार म्हणतात ,’मीना जी चंद्रासारख्या या दुनियेत आल्या आणि त्याच्याच प्रमाणे कुणाला चाहूल न लागू देता इथून गेल्या. सूर्य मावळताना बघता येतो पण चंद्रास्त होतो तेव्हा सगळी दुनिया गाढ झोपेत असते. आपल्या शितल प्रकाशाची दुलई धरतीवर घालून चंद्र पाऊल न वाजवता निरोप घेतो.मीनाजी आपल्या असंख्य आठवणींची दुलई चाहत्यांच्या अंगावर ठेवून अशाच गेल्या. ‘ हे अगदी खरं आहे.या प्रतिभावंत अभिनेत्री आणि कवियित्रीला पन्नासाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली तेहतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *