युध्दज्वर विकास कुंठित करत असतो – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

युध्दज्वर विकास कुंठित करत असतो – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

युध्दज्वर विकास कुंठित करत असतो

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

अंबप ता. ४,आज जगामध्ये अनेक राष्ट्रे अण्वस्त्रसज्ज आहेत. अण्वस्त्रांची दाहकता काय असते हे जगाने हिरोशिमा ,नागासकीवरील हल्ल्यावेळी १९४५ सालीच अनुभवलेले आहे. तरीही रशिया,अमेरिकेसारखी राष्ट्रे काहीवेळा अणूहल्ल्याची धमकी देतात.पण आज अशा युद्धाची शक्यता नाही.मात्र आक्रमण होईल या शक्यतायुक्त भीतीमुळे सर्वच देशांची युद्धसज्जता वाढते आहे. परीणामी संरक्षणावरील खर्च कमालीचा वाढतो आहे. त्यामुळे विकासाची अपेक्षित गती गाठता येत नाही.उलट गरजेच्या मानाने ती कुंठित होताना दिसते. युध्दज्वर विकास कुंठित करत असतो आणि विधायक विकासाच्या भूमिकेशी युद्ध विसंगत असते. युद्ध हा संघटित हिंसाचार आहे व शांतता ही परस्पर सहकार्यावर अवलंबून असते, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते विवेक वाचनालय अंबप यांच्या ‘ विवेक व्यख्यानमालेत ‘ युद्ध नको शांतता हवी ! ‘ या विषयावर बोलत होते.वाचनालयाचे अध्यक्ष बी. टी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रारंभीच देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. तसेच निवृत्त सैनिक आणि अन्य सेवानिवृतांचा सत्कारही करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,मानवी उत्क्रांतीत आदिमानवाच्या काळापासून युद्धे झालेली आहेत.आधुनिक काळात सत्तावर्चस्व ,घुसखोरी, विस्तारीकरणाची खुमखुमी यासारख्या अनेक कारणांनी लहान मोठी युद्धे होत आली आहेत. अगदी अडीच हजार वर्षापूर्वी अलेक्झांडरने सिंधू नदी ते इजिप्त आणि इराण पासून ग्रीक पर्यन्त साम्राज्यविस्तारासाठी केलेली अनेक युद्धे ते आत्ताचे रशिया – युक्रेन युद्ध यापर्यंतचा इतिहास आपण ध्यानात घेतला पाहिजे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात सात कोटींवर माणसे मारली गेली हेही आपण जाणतो. पंडित नेहरूनी घेतलेली अलिप्ततावादाची भूमिका आणि मांडलेली पंचशील तत्वे याचे महत्व आजही फार मोठे आहे.भारताच्या विकासामध्ये ही भूमिका महत्त्वाची ठरली आहे.जगामध्ये युद्धात होरपळलेल्या सर्व जनतेने व सैनिकांच्या पालकांनी युद्धविरोधी भूमिका घेत शांततेचा आग्रह धरणारे संघटित मोर्चे काढले हेही लक्षात घेतले पाहिजे.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,हिंसेतून हिंसाच वाढत जाते आणि शांततेतून शांततामय सहजीवन आकाराला येते हे वैश्विक सत्य आहे.आज बाजारपेठ ताब्यात घेण्यापासून इतर अनेक कारणानी युद्धे होत असतात.तसेच ती केवळ दोन राष्ट्रात अथवा राष्ट्र समूहात होत असतात असे नव्हे. तर एका देशांतर्गतसुद्धा ती होत असतात. ती कधी रौद्ररूप धारण करतील सांगता येत नसते. असमान विकास,पराकोटीची धर्मांधता, अतिरेकी परधर्माद्वेष, हिटलरी विचारांचा विकृत प्रभाव , नेतृत्वाची संकुचितता अशा अनेक कारणांमुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. हे ध्यानात घेतले पाहिजे आणि म्हणूनच शांतता-सहकार्य आणि विकास हे सूत्रच जगाला तारू शकेल.संहाराने प्रश्न सुटत नसतात तर बिकट होत असतात. यावेळी सरपंच बी.एस. अंबपकर, विलास नाईक, विनायक माने, राहुल माने, बळवंत वरपे, राजाराम माने ,शुभम विभूते ,संपतराव कांबळे ,रमेश दिवाण, सुजाता कार्वेकर ,अमोल कुलकर्णी ,विकास जाधव, संदीप उंडे यांच्यासह नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *