राजेशाहीत सामाजिक न्यायाचे लोकराज्य शाहूरायानी उभारले :
प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

राजेशाहीत सामाजिक न्यायाचे लोकराज्य शाहूरायानी उभारले :<br>प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

राजेशाहीत सामाजिक न्यायाचे लोकराज्य शाहूरायानी उभारले :
प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

सातारा ता. २७ भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संसदीय लोकशाहीसह सर्व मूल्ये स्वीकारून सामाजिक न्यायाची प्रस्थापना करता येते याची शिकवण लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्याला दिली आहे. राजेशाहीमध्ये आदर्शवत लोकराज्य व उभे करणारे ते कृतिशील विचारवंत राजे होते. आजच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण,धर्मकारण आदींना हे बाजारू स्वरूप आले आहे आहे त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांच्या विचारांचा समकालीन संदर्भ मोठा आहे. त्या विचारांवर निष्ठा ठेवून त्याची अंमलबजावणी केली तर विषमतेचा दाह कमी होत समतेकडे अर्थात खऱ्या समृद्ध भारताकडे आपली वाटचाल होईल असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज ( सातारा ) येथे इतिहास विभागाच्या वतीने राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ” राजर्षी शाहू महाराज आणि समकालीन संदर्भ ” या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. अनिल वावरे होते,डॉ. रामराजे माने – देशमुख, इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनाजी मासाळ , प्रा.गणेश पाटील,प्रा.संदीप भुजबळआदी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. धनाजी मासाळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ.संदीप किर्दत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,राजर्षी शाहू महाराजांकडे राजकारणासाठीचा मुत्सद्दीपणा आणि दुरदर्शीपणा होता. योग्य माणसाची पारख करणारी गुणग्राहकता त्यांच्याकडे होती.समाज सुधारकाला लागणारी क्रियाशीलता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होती. कुस्ती व शिकारीसाठी लागणारे शरीर सामर्थ्य त्यांच्याकडे होते.नाट्य व कलांना प्रोत्साहन देणारी कलावृत्ती त्यांच्याकडे होती. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक प्रबोधनाची दिशा स्वीकारून आपली सत्ता व संपत्ती लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी खर्च केली. ही राजर्षी शाहू महाराजांची गुणवैशिष्ट्ये आजच्या काळात अतिशय महत्त्वाची आहेत.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,आपल्या संस्थानाच्या सर्वांगीण विकासात अतिशय गंभीरपणे व सूक्ष्मपणे लक्ष देणारे त्या काळातील भारतातील ते दुर्मिळ राजे होते.पन्नास टक्के आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा, अस्पृश्योद्धार ,माणगाव परिषद, जातीभेदाशी-धर्मभेदाशी मुकाबला ,स्त्रियांच्या संरक्षणाचे कायदे, शैक्षणिक क्रांती व वसतिगृहांची उभारणी ,क्षात्र जगद्गुरु पदाची निर्मिती, कामगार चळवळीला चालना, शेती – उद्योग- सहकार यांचे विस्तारीकरण ,शिकार – मल्लविद्या- -संगीत-नाटक-चित्रपट- चित्रकला आदी कलांना प्रोत्साहन, राधानगरी धरणाची निर्मिती, प्रबोधनाची भविष्यवेधी भूमिका अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये शाहू राजांच्या राज्यकारभारात दिसून येतात. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानातून राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य यांचा समकालीन संदर्भ स्पष्ट केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.अनिल वावरे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी असंघटित कामगारांना इंग्लंडच्या कामगार क्रांतीचे संदर्भ दिले.परस्पर प्रेम ,सहकार्य ,विश्वास आणि चिकाटी या आधारे कामगार चळवळ बळकट करण्यास सहकार्य केले. त्यांनी पाटबंधारे खाते निर्माण केले. शेतमालाला किमान भाव मिळाला पाहिजे याकडे लक्ष दिले. शेतीच्या संशोधनासाठी संस्था काढली. शेतकरी आणि सैनिक या बरोबरच उद्योग आणि व्यापारातही आपण पुढे गेले पाहिजे हे स्पष्ट करून सहकाराला चालना दिली. रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास डॉ.भास्कर कदम, डॉ.शिवाजी पाटील ,डॉ. आर.आर.साळुंखे ,डॉ. सुधाकर कोळी ,डॉ. केशव पवार ,डॉ.आर.पी.भोसले, डॉ.गजानन चव्हाण ,डॉ. नीलकंठ लोखंडे ,डॉ.विकास यलमार ,डॉ. संपतराव पिंपळे, डॉ. भूपेंद्र निकाळजे, डॉ. अभिमान निमसे, डॉ..हीरोजी देशमुख, डॉ. संजयकुमार सरगडे यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. एम.डी. चिंदे यांनी आभार मानले.प्रा. माधवी गोडसे व प्रा.सीमा कदम यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *