राष्ट्रीय बोधचिन्हा पासून घ्यायचा बोध

राष्ट्रीय बोधचिन्हा पासून घ्यायचा बोध

राष्ट्रीय बोधचिन्हा पासून घ्यायचा बोध
––————————

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )

नव्या संसद भवनावर राष्ट्रीय बोधचिन्ह असलेल्या भव्य अशोकचिन्हाचे सोमवार ता.११ जुलै २०२२रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले. ब्रांझ धातूचे हे बोधचिन्ह २१ फूट उंच असून साडे नऊ टन वजनाचे आहे. या बोधचिन्हाचा पाया म्हणून साडेसहा टनाचा एक चौथरा बसवलेला आहे. हे मानचिन्ह बसवण्यासाठी नऊ महिन्यांच्या कालावधी लागला.संकल्पना, रेखाचित्र, प्रारूप आणि संगणकीय आरेखन अशा वेगवेगळ्या आठ टप्प्यांमध्ये हे काम करण्यात आले. हे मानचिन्ह एकशे पन्नास भागांमध्ये तयार करण्यात आले.सर्व भाग छतावर नेऊन जोडणी करण्यात आले. ही जोडणी करण्यासाठी दोन महिने लागले.आदी माहितीही प्रसिद्ध झाली आहे.

या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण मूळ चिन्हापेक्षा दर्शनी सिंहाचे दिसणारे हिंस्त्र निराळेपण, अन्य पक्षांना कार्यक्रमाला न बोलावणे,सरकारच धर्मनिरपेक्ष घटनेची शपथ घेऊनही अशावेळी विधिवत पूजा करणं, संसदेत लोकसभा अध्यक्ष प्रमुख असतात त्यामुळे असे अनावरण करण्याचा त्यांचा जो अधिकार आहे तो पंतप्रधानांनी हिरावून घेतला आदी अनेक बाबी चर्चेत येत आहेत.घटनेची व तिच्या तत्वज्ञानाची उघडपणाने होणारी पायमल्ली आणि त्यावर माध्यमांनी मूग गिळून गप्प बसणं हे अतिशय वाईट आहे.पण या राष्ट्रीय चिन्हाबरोबरच आपण ‘ सत्य मेव जयते ‘हे बोधवाक्यही स्वीकारले आहे.याचा कोणीही विसर पडू देऊ नये.म्हणूनच राष्टीय बोधचिन्हाचे नव्या वास्तूत अनावरण होत असताना त्यातील खरा बोध सर्वांनी घेणे गरजेचे आहे. अनावरण करणाऱ्यांपासून ते हे वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या, पाहणाऱ्यांपर्यंत सर्वांचीच ती सामूहिक जबाबदारी आहे.

इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या जगप्रसिद्ध सम्राट अशोकाची महती अगाध आहे. त्याने इसवीसन पूर्व २६१ मध्ये कलिंगवर साम्राज्य विस्तारासाठीच आक्रमण केले होते.मात्र त्या युद्धातील अपरिमित प्राणहानीमुळे त्याला पश्चाताप झाला.आणि तो शांती व अहिंसा सांगणाऱ्या बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला. राज्य विस्ताराचे कार्य दुष्ट स्वरूपाचे असते त्यापेक्षा नैतिक विजय महत्त्वाचा असतो हे त्याला कळून चुकले.तेव्हापासून तो देशांतर्गत व परराष्ट्रीय पातळीवरही शांततामय राजकारणावर भर देऊ लागला. अशोकाच्या काळी भारताचे जेवढे राजकीय ऐक्य झाले तेवढे त्यापूर्वी किंवा त्यानंतर झाले नाही असे मानले जाते.हा भाग आजचा भारत,पश्चिम पाकिस्तान, पूर्व अफगाणिस्तान असा होता.

सम्राट अशोकाने बौद्ध विचाराला ‘सद्धर्म ‘ मानले.सत्य,अहिंसा,दया, प्रेम,न्यायीपणा,संयम,सहनशिलता, सक्रियता याआधारे राजाची कर्तव्ये व लोकांचे अधिकारही सांगितले. ती सारी आचारसंहिता शिलालेख ,स्तंभ यावर कोरून ठेवली.त्याने शेकडो मठ आणि चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधल्याचा उल्लेख आहे. सम्राट अशोकाने लोकहिताच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभावर करून ठेवल्या त्यांना ‘ अशोक स्तंभ ‘ असे म्हटले जाते.असे अनेक अशोक स्तंभ सम्राट अशोकाच्या साम्राज्यात विविध ठिकाणी होते. सारनाथ, संकीसा ,बनारस श्रावस्ती आदीअनेक ठिकाणी असे स्तंभ आहेत. या सर्व अशोकस्तंभात सारनाथ येथील स्तंभाला सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. हा स्तंभ अशोकाने मृदगाव येथे उभारला होता.

२६ जानेवारी १९५० रोजी म्हणजे आपल्या देशाच्या पहिल्या लोकसत्ताक दिनी आपण सारनाथ येथील अशोकस्तंभावरील तीन सिंहांचा उर्ध्वभाग ,त्यांच्या खालील धम्मचक्र, उजवीकडील वृषभ आणि डावीकडील घोडा हे घटक आणि त्याखालील मंडूकउपनिषदातील ‘सत्यमेव जयते’ हा शब्दसमुच्चय अशी येऊन योजना केलेल्या त्रिमूर्ती बोधचिन्हाचा स्वीकार केला आहे. मूळ अशोक स्तंभावर चार सिंहांचा उर्ध्वभाग आहे. चार दिशांना चार मुखे असलेल्या या सिंहांतील पाठीमागील सिंह पुढील सिंहाने झाकला जातो. त्यामुळे या तीन सिंहाच्या अर्धशरीराचा भाग बौद्धचिन्हात घेण्यात घेतलेला आहे.सामर्थ्य, धैर्य,आत्मविश्वास व अभिमानाचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. हे सिंह विशिष्ट मौर्यशैलीत कोरलेले आहेत.त्या खालील नक्षीदार बैठकीच्या कोरीव चित्र मालिकेत हत्ती, घोडा, बैल ,सिंह व चोवीस आरे असलेले चक्र आहे .त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. सारनाथचा हा अशोक स्तंभ मौर्यकालीन मूर्तीकलेच्या अत्युच्च विकासाचा पुरावा मानला जातो. यातील चोवीस आऱ्यांचे अशोक चक्र हे ‘सत्यधर्माचे आणि शांततामय परिवर्तनाचे प्रतीक’आहे असे डॉ. राधाकृष्णन यांनी म्हटले होते.तर पंडित नेहरूंनी अशोक चक्राला ‘ प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतीक ‘ असे म्हटले होते. ( सत्य,शांतता आणि उलटे कमळ याचा समकालीन संदर्भ मोठा आहे.सम्राट अशोकाचे द्रष्टेपणाचा हा आणखी एक पुरावा आहे. )हे बोधचिन्ह संसद, सर्व न्यायालये आदी स्वतंत्र देशाच्या सर्व शासकीय संस्थांवर शिल्प रूपाने स्थापित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे चलनी नोटांसह पासपोर्टपासून रेशनकार्ड पर्यंत सर्वत्र त्याची मोहर छापलेली दिसून येते. या राष्ट्रीय बोधचिन्हाचे महत्त्व अतिशय व्यापक आहे.

या बोधचिन्ह खाली ‘ सत्यमेव जयते ‘हे बोधवाक्य लिहिले आहे. त्याचाही समकालीन संदर्भ मोठा आहे.अंतिमतः सत्याचाच विजय होणार हे सार्वकालिक सत्य आहे. असत्य अल्पकाळ जयते हेही खरे आहे.कारण असत्य भूलथापा मारून, लबाडी करून, लोकद्रोह करून विजयी होते.असत्याचे नागवे दर्शन झाले की काय होते हे आज श्रीलंकेत दिसत आहेच. पण तरीही आज अनेक ठिकाणी असत्याचा भडीमार सुरू आहे.आधुनिक भाषेत त्याला फेकूगिरी म्हणतात.आणि खोटे बोलणाऱ्याला फेकू म्हणतात हे आपण जाणतो. हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. महात्मा गांधींजी आपले राष्ट्रपिता आहेत. गांधीजींनी त्यांच्या राजकारणासाठी जे मार्ग अवलंबलेले होते ते सत्याचा आग्रह धरणारे होते. हे सत्य त्यांना भारतीय संस्कृतीच्या अभ्यासातून गवसले होते. म्हणूनच गांधीजी सत्याबाबत ‘ ईश्वर सत्य है ‘ पासून ‘सत्य ही ईश्वर है ‘ या भूमिकेपर्यंत आलेले होते.
पंडित नेहरू यांनी म्हटले आहे की, ‘ गांधीजी सत्यमय साधनांवर जोर देत असतात.मलाही त्यांचे म्हणणे पटते, आवडते. साधने शुद्ध असावी यावर गांधीजींनी जो भर दिला आहे तीच त्यांची सर्वात थोर अशी सार्वजनिक सेवा आहे. सत्याग्रह हे गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सूत्र आहे. सत्य ही त्यांची जीवन साधना होती.’ त्यांनी म्हटले आहे ,”माझ्या मते सत्य सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यात असंख्य वस्तूंचा अंतर्भाव होऊ शकतो. हे सत्य म्हणजे स्थूलवाचिक सत्य नव्हे .ते जसे वाचिक तसे वैचारिकही आहे.हे सत्य म्हणजे केवळ आपण कल्पिलेले सत्य नव्हे,तर स्वतंत्र – चिरंतन सत्य होय.सत्य हाच ईश्वर .सत्याचे दर्शन अहिंसे शिवाय होऊ शकत नाही.म्हणूनच अहिंसा परमोधर्म : म्हटले आहे.’ सत्याबद्दल अतिशय व्यापक भूमिका घेणाऱ्या गांधीजींना जे योग्य व न्याय असेल तेच सत्य हे अभिप्रेत होते. म्हणूनच मागण्यांसाठी ,हक्कांसाठी, अहिंसात्मक मार्गाने लढा देणे म्हणजेच सत्याग्रह ही गांधीजींची संकल्पना होती .धार्मिक प्रवृत्ती असलेले गांधीजी सत्याग्रहालाच आत्मिक बाळाचा प्रकार, आध्यात्मिक हत्यार समजत असत .अर्थात ज्यांची नीतिमत्ता मोठी असते तेच सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारतात हे त्यांनी स्वतःच्याच उदाहरणावरून पटवून दिले आहे.नव्या संसद भवनावर आपले राष्ट्रीय बोधचिन्ह अनवरीत करताना हे सारे ध्यानात घेतले पाहिजे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली तेहतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे संपादक आहेत.)


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *