आम्हाला आमचे दोष दिसतील तर! ( स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात नव्या राष्ट्रभक्त जाती निर्माण प्रयास. )

आम्हाला आमचे दोष दिसतील तर! ( स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात नव्या राष्ट्रभक्त जाती निर्माण प्रयास. )

आम्हाला आमचे दोष दिसतील तर!
____________

( स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात नव्या राष्ट्रभक्त जाती निर्माण प्रयास. )

गोपाळ गणेश आगरकर यांनी महाराष्ट्रदेशी बुद्धीवादी परंपरा रुजवण्यासाठी खूप मूलगामी मांडणी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या एका निबंधामध्ये आम्हाला आमचे दोष दिसू लागतील काय? असा महत्त्वाचा एक निबंध लिहिला आहे याचा संदर्भ घेऊन आजच्या वर्तमानातील समाजवर्तनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखांमध्ये केला आहे.

आगरकर म्हणाले होते की, भारतात सध्या देशभक्त होणारी एक नवी जात तयार होऊ लागली आहे, आगरकरांचे हे विधान स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये तपासले असता आजही ते तंतोतंत लागू पडत असल्याचे आढळून येत आहे. आगरकरांना देशभक्तांची एक नवी जात तेव्हा दिसली होती पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आज देशभक्ताच्या जातीमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था तयार झाली आहे, देशभक्तांच्या जातींची वर्तमानातील स्थिती काय आहे? स्वरूप कसे स्पष्ट करता येते? हे पाहता देशभक्त जाती स्वतःकडे देशभक्तीचा ठेका घेतात, राष्ट्रीय अस्मितांची प्रतीके, राष्ट्रगीते ,झेंडावंदन, तिरंग्याला सलाम, तिरंग्याचा गौरव ही कार्ये अत्यंत श्रद्धेने दिखाव पद्धतीने हा वर्ग करीत असतो. यातूनच देशभक्तांची एक नवी जात अर्ध- निरक्षर समाजामध्ये तयार होते.

देशभक्त जातीचा वर्ग आम्हाला राष्ट्र कळते, राष्ट्रभक्ती कळते, आम्ही देशनिष्ठ आहोत अशा प्रकारची भाषिक कृती ते करीत असतात, त्यांची ध्येयबोली ही तशीच असते त्यामुळे ते देशभक्तीच्या जातीला आदी मान्यता देण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात.

भारतामध्ये विषमतेने जर्जर झालेल्या समाजात हजारो जाती मुळात निर्माण केल्या गेल्या ( जाहल्या) आहेत. ज्या भक्तांनी त्या तयार केल्या आहेत तो वर्गच आता देशभक्त जातीचा नवी व्यवस्था सुप्तपणे तयार करीत आहे. देशभक्त जातीच्या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आत्म प्रौढीवादी असतो, देशभक्त जातीचा वर्ग हा प्रदर्शनीय वर्तन करतो, देशभक्त जातीचा वर्ग शासन स्तरावरील देशभक्तीची कर्मकांडे स्वतः पुढाकार घेऊन करीत असतो, तेथे तो नेता बनतो, अशावेळी सामाजिक अभिसरण न झालेला दबलेला असा अन्यवर्ग या दिखाऊ देशभक्तीच्या कर्मकांडामध्ये गोंधळून जातो आणि त्यामुळे दिखाऊ देशभक्तीचा जात वर्ग हा आपसूकपणे प्रभुत्व गाजवतो, स्वताला श्रेष्ठ स्वतःला समजू लागतो आणि हेच रुजू लागते.

देशभक्त जात वर्ग हा, अन्य व जात वर्गांचा द्वेष करतो आणि त्या जात वर्गांना तो महत्त्व देत नाही, स्थान देत नाही, सार्वजनिक जीवनात हेतूता अन्य जात वर्गांची उपेक्षा देशभक्त जात वर्ग करीत असतो, तो वर्तमानाला नाकारतो, भूतकाळाला कंटाळतो, भूतकाळाचा इतिहास तो डोक्यावर घेतो, त्यामध्ये देशभक्त जात वर्गाचे जे संमिश्रवर्तन असते, ते वर्तन उघड होऊ नये अशीही काळजी तो घेतो. उदाहरणार्थ स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झालेल्या वर्गाने सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पुढाकार घेणे हे त्याचेच उदाहरण आहे, म्हणून देशभक्त जात वर्ग हा भूतकाळ पुसून टाकतो, हुतात्म्यांचा त्याग त्यांचे बलिदान पुसून टाकतो, त्यांना नको असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचा इतिहास तो चर्चेत येऊ नये याची काळजी घेतो, आणि दिखाऊ, प्रदर्शनीय ,देशभक्ती तो दाखवीत राहतो, हातात झेंडा घरावर झेंडा ही उपक्रमशीलता त्यातूनच येते.

देशभक्त जातींचा वास्तव स्वीकारण्याचा विचार नसतो, वर्तमानातील अन्य जातींचे कर्तुत्व त्यांचे समाज व राष्ट्रीय योगदान हे त्यांना समजून घेणे सांगणे व त्याला मान्यता देणे हे त्याला जमत नाही, हे सहन होत नाही म्हणून ते भूतकाळाची गौरव पूर्ण प्रेत यात्रा काढत राहतात. देशभक्त हा नवजात वर्ग सत्ताधारी असतो, तो शासन प्रतिनिधींना यामध्ये सहभागी करतो, देशभक्त जात वर्ग साहित्य कला संस्कृती यांच्यावर देशभक्तीचे लेबल लावतो आणि देशभक्तीचे भरते तो कृत्रिम पद्धतीने जनसामान्यांच्या मनात आणतो, ही सामान्य वाटणारी कृती निरुपद्रवी असते पण ती खोल जाणिवांच्या मध्ये परिणाम करते. उदाहरणार्थ देशमुख जात वर्ग हा वर्तमानातील प्रभुत्व जातींच्या मधील सरंजाम वर्गाला चुचकारतो.

देशभक्त जात वर्ग आणि सरंजाम वर्ग हे भारतीय समाजातील शतकानं शतके प्रभुत्व जातीवर्ग असून ते अमानुष शोषण करणारे वर्ग आहेत, शोषणाच्या मानसिकतेमुळे त्यांना प्रत्येक जनजातीच्या वर्गांची मानसिक दुखे प्रतीत होत नाहीत,
देशभक्त जातीचा हा वर्ग नफरतवादी, तुच्छतावादी असतो, समाजातील किमान बरे किमान निरुपद्रवी जेकाही वर्तन असते ते सुद्धा देशभक्त जातीला आवडत नाही, देशभक्त जाती या इतर जातींच्या संघर्षपूर्ण जीवनाचा द्वेष करतात, त्यांचे भौतिक यश नाकारतात, त्यांना समाज जीवनाच्या सहभागापासून कुटील राजकारण करून दूर ठेवतात. खालच्या जनजातींचे गुणांचे कौतुक देशभक्त जात करत नाही, देशभक्त जात ही खालच्या जनजातींची टवाळी करणे, निंदा करणे, अपमान करणे, त्यांना बहिष्कृत करणे, समाज प्रवाहातून वगळणे या कृती करण्यामध्ये देशभक्त जातीय यशस्वी होतात, देशभक्त जाती या खोल अशा पातळीवर आदी मान्यतेसाठी, आत्मस्थितीसाठी, गौरवासाठी ,प्रतिष्ठेसाठी नेहमी
हपापलेल्या असतात.

देशभक्त जातींच्या बरोबर संपूर्ण भारतात पसरलेला धनिक सरंजाम वर्ग हा त्यांच्या त्यांच्या विभागातील राजेशाहीचे अवशेष सांभाळणे, सतत त्याचे उदात्तीकरण करणे, ही प्रचार मोहीम ते सतत राबवत असतात, आपण प्रमुख आहोत, आपल्याला समाजातील सामान्य घटकांनी विचारले पाहिजे, आपली मते, आपल्या भूमिका आपले निर्णय हे तळातले जनजातींची स्वीकारले पाहिजेत, आमचे प्रभुत्व मान्य केले पाहिजे, ही सरंजाम मानसिकता भारतामध्ये सर्व जनजातींच्या मध्ये खूप खोलवर रुजलेली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये व्यक्तींची सार्वभौम प्रतिष्ठा व व्यक्तीच्या जीवनाची स्वतंत्रता असते, व्यक्तीने तसेच जगायला हवे ही स्वतंत्रता इतरांनी मान्य करून वर्तनाला अवकाश उपलब्ध करून दिले पाहिजे. स्वयंप्रतिष्ठ इतकीच इतरांची ही प्रतिष्ठा असते हे अमान्य करून हा सरंजाम जात वर्ग गावगाडा ते दिल्ली गाडा इथपर्यंत तो इतर जनजातींच्या जगण्याला कोणत्याही समाजसेवेच्या कोणत्याही भूमिकेला सरंजाम वर्ग मान्यता देत नाही, सरंजाम वर्ग हा पराभूत मानसिकतेच्या कर्तृत्व शून्यतेच्या अवस्थेमध्ये चाचपडत असतो, जुने जातीय अभिनेष, श्रेष्ठत्वाचा अहंकार हा त्याला सामान्य नागरिक होऊ देत नाही, यातूनच सरंजाम हे स्वतःला प्रभुत्व जातीच्या मधील श्रेष्ठ मानण्याची चूक सतत करीत असतात त्यातूनच प्रभुत्व जाती म्हणजे ब्राह्मण जातीनंतरच्या सर्व जाती होय.
सरंजाम जातींचे वैशिष्ट्य म्हणजे जात हेच प्रभुत्व, सांस्कृतिक सभ्यता ही शून्य आपल्याकडे आहे तरीही आपण श्रेष्ठ आहोत अशा अहंकाराने ग्रस्त झालेल्या सरंजाम जाती भारतामध्ये वाढत आहेत, यांचे सरंजामी अवशेष वाडे, जातीचे आडनावे, आडनावाच्या बहुसंख्यकांची गावे, आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मिळालेल्या संधीतून स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था, बँका, विकास सोसायटी यांचा ताबीदार हक्क म्हणजे सरंजाम जातींची विस्तारित छोट्या राज्य राज्यव्यवस्थेची मालकी होय. सरंजाम हे संस्था, राजकारण जात राजकारण व प्रभुत्वराज्यकारण हे एकाच वेळेला करतात, संस्था जात प्रभुत्व हे राजकारण करीत असताना गावगाड्यातील निर्मम शोषण त्यांचे चालू असते. खालच्या सर्व जनजातींच्या वरील अत्याचार याचे अपराधी भान सरंजामी मानसिकतेला अजिबात असत नाही. सरंजाम हे अपराध्यशून्य मानसिकतेने जगतात.
*सरंजाम हे त्याअर्थाने सूर्याला सूर्य म्हणत नाहीत ,पाण्याला पाणी म्हणत नाहीत, आमचे पाणी ,आमचा सूर्य, आमचे गाव असा मालकी हक्काचा अहंकार भाषिक व्यवहारामध्ये त्यांचा सतत स्पष्ट होतो, अनुभवास येतो. सरंजाम हे नेते असतात, असे शूद्र जाती स्वतःहून मानतात, शूद्र जाती आणि सरंजाम यांचे एकमेकाबद्दलचे मालक आणि दास याचे नाते असेच व्यवस्था शरणता आणि बौद्धिक गुलामी यातून पुढे चालत येते, दुर्दैवाने आज सरंजाम जाती आणि देशभक्त जाती या पुन्हा एकदा एकत्रित येऊन देशभक्त तिच्या नावाखाली प्राचीन विषमतेच्या जर्जर जातींचा नवा पिंजरा ते तयार करीत आहेत, आणि त्यातूनच सरंजाम जातींना व देशभक्त जातींना तसेच खालच्या शूद्र जातींना सर्व धर्मातील जातींना आपले स्वतःचे दोष हे दाखवलेले आवडत नाहीत. असे दोष त्यांना स्वतःला समजत नाहीत आणि असे दोष समजले तरीही ते मान्य केले जात नाहीत. चुकीचे असलेले दोष नाहीसे करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही आणि त्यामुळे आम्हाला आमचे देशभक्त जातींच्या आणि सरंजामी अत्याचारी मानसिकतेचे दोष लख्खपणे दिसत नाहीत, आम्ही हे दोष नाहीसे करण्याची काळजी घेत नाही हे सर्वात वाईट आहे.
कोणतीही जात हा अपघात आहे, सरंजाम जाती व देशभक्त जाती ही पुण्याची गणना नव्हे, पुण्याच्या गणनेने येथे काहीही प्राप्त होत नाही, हे सगळे अकस्मातचे परिणाम आहेत, याला उदात्तीकरण करणे अनुचित आहे.

म्हणून आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे देशभक्त जातींनी आपला अहंकार सोडायला हवा, सरंजाम जातींनी श्रेष्ठत्वाची आंतरिक भूक टाळायला हवी, सर्व जनजातींचे कर्तृत्व मान्य करायला हवे, बुद्धी वस्तुनिष्ठता बुद्धीच्या प्रामाण्यावर वर्तन करणे, ते सर्वन्यायी वर्तन स्वीकारणे ही न्यायवृत्ति देशभक्त जातींच्या मध्ये रुजली पाहिजे, सरंजामी जातींच्या वर्तनात अत्याचाराचा अधिकार हे स्वातंत्र्योत्तर काळातील जे वर्तन आहे सरंजाम व देशभक्त जाती यांना खरे तर स्वातंत्र्यामुळे आपले प्रभुत्व गमावल्याचे शल्य आहे, तरीही ते न दाखवता पुन्हा देशभक्त जातीचा वर्ग आपण तयार करू शकतो आणि सर्व शूद्र जातींच्या वर प्रभुत्व गाजवू शकतो हा कुटील डाव देशभक्त जातींनी आता टाकला आहे.

शूद्र जातींचा खूप गंभीरपणे विचार करायला हवा, देशभक्त व सरंजाम यांच्या होकाराचे इशाराचे संकेत मिळवत राहणे हे शूद्र जातीचे जगणे नव्हे, शूद्र जातींनी स्वतंत्रता स्वयं निर्णयाची कृतीशीलता अंगी बाळगायला हवी, बौद्धिक पातळीवर देशभक्त जाती व सरंजाम जाती यांचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही, होऊ दिला जाणार नाही इतकी स्वतंत्र निर्भय वृत्ती शूद्र जातींनी अद्याप प्राप्त केलेली नाही, त्यामुळे तर देशभक्त जाती व सरंजाम जाती वर्ग हा त्रिवर्णीय जातींना नेहमी दबावाखाली ठेवतो, त्यांना भय ग्रस्त बनवतो, त्यांना अस्थिर करतो , गावाकडील यातील जीवनात एकाकी पडतो आणि मानसिक छळ वाद खालच्या शूद्र जातींचा सतत चालू असतो.

याचे नेनिव पातळीवरील विश्लेषण होणे आवश्यक आहे,
खालच्या शूद्र जातींना देशभक्त व सरंजाम जातींची आपण त्यांना भेटले पाहिजेत, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे ,त्यांच्या मार्गदर्शनानुसार जगले वागले पाहिजे, ही कृतक शरणवृत्ती हे शूद्रांचे दोष आहेत. स्वयं कष्ट, स्वयं कृती, स्वयं निर्णय, स्वयंअर्थप्राप्ती, स्वयं बुद्धीचा अविष्कार हे खालच्या जनजाती स्वतः वेगळेपणाने करीत असतात तरीही सार्वजनिक जीवनातल्या मानसिक एकाकेपणाने पछाडलेले हे शूद्र बंधू जन हे आपले दोष कधी समजावून घेतील का?स्वतःची स्वयंप्रज्ञा, स्वयं निर्णय, स्वयं कृतीशीलता स्वयं आधी मान्यता मिळवत राहणे, स्वातंत्र्य उत्तर काळात खालच्या जातींना (शूद्रांना ) हे सहज शक्य आहे, किंबहुना खालच्या सर्व जनजातींचा प्रवास असाच सतत चालत आलेला आहे, असे असताना खालच्या सर्व जनजातींनी आमचे स्वतःचे दोष स्वतः कमी करण्यासाठी हे समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एकूणच देशभक्त जाती, सरंजाम वर्ग आणि खालच्या सर्व जनजाती यांनी आता स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये आम्हाला आमचे दोष दिसतील काय ?असे केवळ न म्हणता स्वतःच्या वर्तनात अमलाग्र बदल करीत दोषांचे परिशिलन करीत पुढे जाणे, हाच स्वातंत्र्योत्तर काळातील ७५ वर्षांमध्ये जातीय मानसिकतेचा मांडलेला बदलाचा हा सकारात्मक लेखाजोखा आहे आणि तो स्वयंपरिवर्तनासाठी, दोषांच्या निरसनासाठी स्वीकारल्याशिवाय व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे जय गाणं गाता येणार नाही आणि नव्या देशभक्तांनी तयार करण्यास सुरुवात केलेल्या नव्या जातीची उतरंडी व्यवस्था आपणाला स्वीकारता येणार नाही, त्यासाठी देशभक्त जाती व सरंजाम जाती आम्हाला आमचे दोष दिसतील तेव्हा अशाच स्वयं परीक्षणाच्या अवस्थेत कायम राहण्याची गरज आहे, असे मनोमन वाटून राहते.

स्वातंत्र्योत्तर काळातील हाच बुद्धिवादाचा प्रवास आहे.

शिवाजी राऊत
प्रेस सातारा
१३ऑगस्ट २२.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *