सुळकूड पाणी योजना अंमलबजावणीसाठी सावित्रीच्या ४ लेकींच्या बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ. कृति समितीचा पाठिंबा.
इचलकरंजी दि. १९ – ” इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी “आम्ही सावित्रीच्या लेकी” या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या चार महिलांच्या बेमुदत आमरण उपोषणास शिवजयंती दिनी म. गांधी पुतळा, इचलकरंजी चौकामध्ये प्रारंभ झाला. यावेळी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
“आम्ही सावित्रीच्या लेकी” या महिला गटातील महिला व समन्वय समितीमधील प्रमुख यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता प्रथम या महिलांच्या हस्ते शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर चौकातील मंडपामध्ये उपोषणास प्रारंभ करण्यात आला. शिवजयंतीचे विविध कार्यक्रम असूनही शहरातील नागरिक व विशेषतः महिला भगिनींचा पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रचंड व उस्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता.
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची त्वरीत अंमलबजावणी व्हावी यासाठी दि. ५ ऑगस्ट रोजी याप्रश्नी समन्वय समिती स्थापन झाली. योजना कार्यान्वित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. तेव्हापासून आज अखेर गेल्या पाच महिन्यात संबंधित आमदार, खासदार व मंत्री यांचेकडून यासंदर्भात कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून आलेले नाही. मा. वस्त्रोद्योग मंत्री यांनी दि. ८ जानेवारी रोजी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. तेही अंमलात आले नाही. याबद्दल शहरातील नागरिकांच्या व विशेषतः महिलांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामधून या महिला गटाने स्वतः होऊन बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, भेट घेतली. पण मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे उपोषणास प्रारंभ झाला आहे.
सकाळी झालेल्या या उपोषण प्रारंभ प्रसंगी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या व महिला गटाच्या वतीने समिती समन्वयक प्रताप होगाडे, शशांक बावचकर, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, पुंडलिक जाधव, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, जाविद मोमीन, अभिजित पटवा, वसंत कोरवी, राहुल खंजीरे, नितीन जांभळे, विकास चौगुले, विजय जगताप, उमेश पाटील, महादेव गौड, प्रसाद कुलकर्णी, राजू कोन्नूर, राजू आलासे, माधुरी सातपुते, रिटा रॉड्रिग्युस, सुनील मेटे, गणपती शिंदे, प्रकाश मोरबाळे, संभाजी सुर्यवंशी, रमेश पाटील, शोभा गोरे, गीता कुरुंदवाडे, वहिदा सय्यद, सीमा पाटील इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.