मुंबई मनपातील सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय!
8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार,
लाडे पागे समितीच्या शिफारशी लागू होणार त्याचा फायदा 50 हजार कामगारांना,
कामगारांना सरकारी योजनेतून मालकी हक्कांची घरे, महापालिकेचा पाठपुरावा!
समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला मोठे यश
लवकरच विजय मेळावा
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. 8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार असून, यासोबतच लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू करण्यात येणार असल्याने विविध आस्थापनांतील सुमारे 50 हजार कामगारांना त्याचा थेट लाभ मिळणार असल्याचे काल मनपा प्रशासनासोबत झालेल्या करारात स्पष्ट झाले.
या ऐतिहासिक विजयाचे नेतृत्व समाजवादी कामगार नेते साथी कपिल पाटील यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली काल 27 जुलै 2025 रोजी ही निर्णायक बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कपिल पाटील यांनी सफाई कामगारांच्या आंदोलनाबाबत रदबदली केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप टळला होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्तांसोबत कामगार संघटनांच्या दोन बैठका झाल्या. सफाई कामगारांच्या मागण्यांना न्याय देण्याचा मार्ग मोकळा झाला.
म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी आणि मनपा कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने या बैठकीत सहभाग घेतला आणि अनेक मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, कोणतेही पद कमी न करता 8 हजार कंत्राटी कामगारांना कायम करण्यात येणार आहेत, लाड पागे समितीच्या शिफारशी लागू होणार असून त्याचा थेट लाभ 50 हजार कामगारांना मिळणार हे या कराराचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक यश ठरते.
लाड-पागे समितीच्या शिफारसी अंमलात आणण्याचा निर्णय फक्त काही निवडक कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित न राहता सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. वेतन, सेवा-सुविधा आणि सुरक्षितता यांच्याबाबतीत मोठा बदल घडवणारा हा टप्पा आहे. शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजेतून कामगारांना मालकी हक्क मिळवून देण्याबाबत महापालिका स्वतः पाठपुरावा करील असे आश्वासनही बैठकीत देण्यात आले.
या ऐतिहासिक निर्णयामागे एकजुटीने लढलेले नेतेमंडळ आणि कामगारांची दीर्घकालीन चळवळ आहे. या बैठकीत समाजवादी कामगार नेते साथी कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरेश ठाकूर, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, रमाकांत बने, वामन कविस्कर, मिलिंद रानडे, रंगा सातवसे, बाबा कदम, देवी गुजर, प्रकाश जाधव, शेषराव राठोड, प्रफुल्लता दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
या संघर्षात सहा संघटना एकत्र आल्या होत्या. त्यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. या लढ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, संघटित संघर्ष, स्पष्ट भूमिका आणि सामाजिक न्यायासाठीची बांधिलकी असेल तर कोणताही अन्याय दूर करता येतो. हा विजय केवळ कामगारांच्या एकजुटीचा आणि त्यांनी न्यायासाठी दिलेल्या लढ्याचा आहे, असे मत हिंद मजदूर किसान पंचायतचे राज्य अध्यक्ष साथी कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे.
कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री आणि आयुक्त यांचे कामगारांच्या वतीने आभार मानले.
लवकरच विजय मेळावा –
या लढ्याच्या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी लवकरच भव्य विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.