🔥 साताऱ्याची शरम: संपदा मुंडे आणि ढासळलेली व्यवस्था
मी एक सातारकर. आजवर ‘माझा सातारा’ म्हणून अभिमानाने मान उंचवणारा मी, पण डॉ. संपदा मुंडे यांच्या घटनेने माझी मान आज शरमेने खाली गेली आहे.
सातारा जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची गौरवशाली राजधानी, शूरवीरांचा इतिहास आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रगल्भ विचारांचा वारसा. पण आज, माझ्याच साताऱ्यात एका होतकरू, शासकीय सेवेत असलेल्या डॉक्टर मुलीवर वारंवार अन्याय झाला आणि तिला न्याय मागूनही मिळाला नाही. प्रशासकीय आणि वरिष्ठ पातळीवर वारंवार दाद मागूनही, कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात आणि त्या नराधमाला सत्तेचा आशीर्वाद मिळतो, तेव्हा ‘स्वराज्य’ शब्दाचा अर्थच हरवतो.
सत्ता आणि सैतान: कायद्याचे रक्षक की भक्षक?
संपदा मुंडे हिच्यावर पोलीस सेवेतील एका व्यक्तीने वारंवार बलात्कार केला आणि प्रशासनाने या अन्यायाकडे डोळेझाक केली. ही घटना केवळ एका व्यक्तीविरुद्धचा गुन्हा नाही, तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची निष्काळजी आणि सत्ताधाऱ्यांची नैतिक दिवाळखोरी दाखवून देणारी आहे.
माझा देवाभाऊ (गृहमंत्री) यांना थेट प्रश्न आहे:
- एका शासकीय महिला कर्मचाऱ्याचा वारंवार बलात्कार पोलीस सेवेतील व्यक्ती करत असताना, गृहमंत्री म्हणून तुम्हाला याची लाज वाटत नाही का?
- असे ‘सैतान’ वर्दीत असताना, त्यांच्या प्रमुखाला शांत झोप कशी लागते?
आज साताऱ्याच्या लोकांना कळून चुकले आहे की, हा जिल्हा आता केवळ यशवंतरावांचा राहिला नाही. येथे आता टोल ठेकेदार आणि वाळू माफिया सत्तेत बसले आहेत, मंत्री झाले आहेत. त्यांचे बगलबच्चे “बापाचं राज्य” असल्यासारखं वागतात आणि दुर्दैवाने, अशा लोकांना ‘देवाभाऊ’ पाठीशी घालतात. सत्तेचे बळ आणि पैशाचे पाठबळ मिळाल्यावर कायदा कसा मुठीत वागतो, याचे हे भयानक उदाहरण आहे.
गुंड-माफियांचे राजकारण: लोकप्रतिनिधींच्या बाजूला कोण?
आपले लोकप्रतिनिधी कोणाला सोबत ठेवतात, यावरून त्यांचे चरित्र आणि त्यांचे राजकारण स्पष्ट होते. माढाचे माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचे मित्र मंत्री जयकुमार गोरे यांच्या आजूबाजूला कधीही सज्जन किंवा अभ्यासू माणूस दिसत नाही, . त्यांच्या सभोवताली कायमच गुंड, वाळूचोर आणि बलात्कारी प्रवृत्तीचे लोक दिसतात, ही सातारा-माढा विभागाची वस्तुस्थिती आहे.
हातात सत्ता आल्यावर लोकप्रतिनिधींनी समाजाला ‘संरक्षण’ द्यायचे असते, पण जेव्हा ते स्वतःच अन्यायी शक्तींना ‘संरक्षण’ देतात, तेव्हा डॉ. संपदा मुंडे यांच्यासारख्या निष्पाप व्यक्ती बळी पडतात.
हतबलतेतून क्रांतीचा जन्म
आज मी सातारकर म्हणून शरमेने आणि हतबलतेने डबघाईला गेलो आहे. ज्या माजावर मी जगायचो, त्या माजाची जागा आज लाचारी आणि निःशब्दतेने घेतली आहे.
संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने केवळ एक जीवन संपले नाही, तर समाजाच्या न्यायावरील विश्वासाचेही खून झाले आहेत. ही वेळ केवळ टीका करण्याची नाही, तर आत्मपरीक्षण करण्याची आहे. साताऱ्यातील जनतेने आता ठरवायला हवे की, त्यांना शूरवीरांचा आणि यशवंतरावांचा वारसा पुढे न्यायचा आहे की, गुंड-माफियांच्या बगलबच्च्यांचे ‘राज’ स्वीकारायचे आहे.
संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देणे हे केवळ त्यांच्या कुटुंबाचे काम नाही, तर संपूर्ण साताऱ्याच्या सामाजिक व राजकीय आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. या हतबलतेतूनच आता क्रांतीचा जन्म झाला पाहिजे.
