वंचित बहुजन आघाडीची कोल्हापुरात जोरदार तयारी: सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर नोंदणीचा आढावा; स्वबळावर लढण्याचे संकेत
कोल्हापूर (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर मतदार नोंदणीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. अतिग्रे येथील ‘आशीर्वाद मंगल कार्यालय’ येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.
स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा!
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी प्रत्येक तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांकडून पदवीधर मतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी पक्षाची आगामी रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले, “जर समविचारी पक्षांकडून वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक जागा मिळत असतील, तरच युती संदर्भात विचार केला जाईल. अन्यथा, वंचित बहुजन आघाडी सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे.”
लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा
बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी ‘स्थानिक लोकांच्या प्रश्नांवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे’, अशी सूचना केली. वंचित बहुजन आघाडीने सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यांची होती उपस्थिती:
या आढावा बैठकीला कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी अध्यक्षस्थान भूषवले. तसेच, युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद सनदी, जिल्हा सचिव अरुण जमणे, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक देसाई, दक्षिण जिल्हा महासचिव दीपक कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष संदिप कांबळे, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय गुदघे इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यात सक्रियता वाढवल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Posted inकोल्हापूर
वंचित बहुजन आघाडीची कोल्हापुरात जोरदार तयारी: सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर नोंदणीचा आढावा; स्वबळावर लढण्याचे संकेत
