छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी

छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असतो. कॉ.पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल…….

छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com

शिवाजी कोण होता ? हे पुस्तक१९८८ साली शहीद गोविंद पानसरे यांनी लिहिले.ते इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित झाले होते.त्यानंतर त्या पुस्तकात वेळोवेळी अभ्यासाअंती भर घालत पानसरे यांनी ते अधिक परिपूर्ण केले. नंतर अन्य प्रकाशनसंस्थांनी ते प्रकाशित केले.गेल्या पस्तीस वर्षात त्याच्या अनेक आवृत्त्या व लाखो प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या. त्याची विविध भाषांत भाषांतरेही झाली. शिवाजी महाराजांचे व्यक्तित्व आणि कार्यकर्तृत्व या पुस्तकातून कॉ. पानसरे यांनी नेमकेपणाने मांडलेले आहे.१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असतो. कॉ.पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल.

‘आगळा राजा शिवाजी ‘ या पहिल्या प्रकरणात आजच्या लोकशाही व्यवस्थेतही शिवाजीराजांचा लोकाभिमुख कारभार किती महत्त्वाचा होता हे कॉ.पानसरे सांगतात.राज्य संस्थापक म्हणून त्यांचे वेगळेपण सांगताना कॉ. पानसरे म्हणतात,’ शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसाहक्काने बसलेला आयतोबा नव्हता.आयत्या पिठावर रेघोट्या उठवणे सोपे असते. त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले.शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता. त्याने राज्य ‘ निर्माण ‘ केले. तो राज्य संस्थापक होता.राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते. शिवाजीने ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप मोठा फरक आहे.’

महाराजांचे कार्य व राज्य हा मुद्दा मांडताना कॉ.पानसरे म्हणतात ,’ शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राजांच्या कार्याहून आणि राज्याहुन सर्वात ठळक वेगळेपण कोणते ?शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रयतेला आपले वाटत होते.हेच ते वेगळेपण आहे असे मला वाटते. खरं म्हणजे एखादा राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती ? ज्या राज्यातील प्रजेला -सामान्य प्रजेला- बहुसंख्य प्रजेला -बहुजनांना हे राज्य आपले आहे असे वाटते ते राज्य उत्तम समजावे.आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो.जगात अनेक देशात आपल्या देशातल्या सारखी लोकशाही आहे. या लोकशाही राज्यातील प्रजेला बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्य आपली वाटतात का ?आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का ?मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे ,आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही.
शिवाजीराजांचे राज्य रयतेला आपले वाटत होते.त्यातून रयतेमध्ये राजासाठी आत्माहुतीच्या प्रेरणा जागृत झाल्या याचे कॉ. पानसरेनी अनेक दाखले दिले आहेत.ते म्हणतात ‘आपण मेलो तरी चालेल ,पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं ,अशी किमया शिवाजीराजे करू शकले.इतर राजांना ते शक्य नव्हते.इतर राजांसाठीही लढणारे होते ,नाही असे नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले. पण त्यांचं लढणं हे मर्दुमकी गाजवून जहागिरी अन इनाम मिळविण्यासाठी होतं. ते मेले ते जहागिरीसाठी आणि इनामासाठी. उदात्त कार्यासाठी नव्हे. शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच. पण सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परिनं सहभागी होती .आणि हे फार महत्त्वाचं होतं.राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रयतेच असत आणि म्हणूनच यशस्वी होत.”
त्याकाळची जहागिरी- इनामदारी- वतनदारी – गावगाडा याची मांडणी कॉ.पानसरे यांनी नेमकेपणाने केली आहे. ते म्हणतात,” शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले. आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला. भेटू लागला. त्यांची विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला.त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला.जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला.वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत,असे शिवाजी सांगू लागला. व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम झाले. वतनदार राज्याच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्याविरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले.कारण रयतेने केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. शिवाजीच्या रयतेला हे सारेच नवे होते. कुठे घडत नव्हते असे होते. त्यांना फरक जाणवत होता व राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते.”

या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन ,शिवाजी राजांची राज्यकारभाराची भाषा, शिवाजीराजांचे शेतकऱ्यांतून आलेले सैनिक, शिवरायांनी व्यापार व उद्योगाला दिलेले संरक्षण आणि गुलामांच्या व्यापाराला बंदी याची चर्चा कॉ .पानसरे यांनी केली आहे. शिवरायांच्या सैन्याबाबत ते म्हणतात ” शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य ,जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा, आज्ञेचा भंग करणाऱ्याना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकऱ्यांमधूनच केलेली सैन्याची रचना ,शिपायांचा शेतीशी व कष्टाची जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राजांचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते. तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते. रयत सैन्याला सहाय्य करत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते.”
‘ धर्मश्रद्ध – पण धर्मद्वेष्टा नव्हे ‘ या तिसऱ्या प्रकरणात कॉ. पानसरे यांनी शिवाजी आणि धर्म ,शिवाजी व मुसलमान ,शिवाजी- राणा प्रताप -पृथ्वीराज चौहान, काही मुस्लीम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता, शिवाजीचे मुसलमान सरदार, मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार, राज्य मुख्य -धर्म दुय्यम ,शिवाजी महाराजांच्या मराठी व हिंदू विरुद्ध लढाया अशा अनेक मुद्द्यांची चर्चा केली आहे. कॉ. पानसरे लिहितात,” शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिम धर्मीयांचासुद्धा भरणा होता.शिवाजी हा मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करत असता तर मुस्लिम शिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुस्लीम सुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता. राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता. राज्य राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती. राज्यनिष्ठा व स्वामिनिष्ठा मुख्य होती… शिवाजी हा धार्मिक राजा होता.तो हिंदू धर्माचा अभिमानी होता. त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली. या गोष्टी खऱ्या आहेत.पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता.मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असे त्याला कधीच वाटले नाही. कारण मध्ययुगातदेखील त्याची धर्मसाधना डोळस होती.”
पुस्तकातील चौथे प्रकरण ‘ शिवाजी – ब्राह्मण- ९६ कुळी – कुळवाडी -शूद्र ‘ हे आहे.त्यात छत्रपतींचा राज्याभिषेकास ब्राम्हणांचा विरोध ,शिवाजीचे ब्राह्मण सहकारी, ९६ कुळी वाल्यांचा शिवाजी विरोध, कुळवाडीभूषण ,शिवाजीच्या कुळाचा पूर्वेतिहास ,शिवाजीचे सहकारी सामान्य शेतकरी, शिवाजी आणि धर्मांतर या मुद्द्यांची चर्चा कॉ.पानसरे यांनी केली आहे. ते म्हणतात,” सामान्यांना शिवाजीने मोठे केले. आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग या सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले.चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होते. आणि ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करून घेते.सामान्यांच्या सहकार्या खेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नाही. उच्च कुळातले जे असत ते बहुतेक सर्व प्रस्थापित असत. त्यांचे त्या काळी बरे चाललेले असे.जे चालले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नसे.जे सामान्य होते त्यांना बदल हवा होता.शिवाजीने त्यांना संघटित केले. शहाणे केले. मोठे केले. आणि जुलूमाला आळा घातला. ज्यांना जुलूम सहन करावा लागतो तेच जुलूम नाहीसा करतात. जुलूम करण्यातच जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील

पुस्तकाच्या पाचव्या व अखेरच्या प्रकरणात ‘इतिहासाचा विपर्यास का ? ‘याची चर्चा करताना
कॉ. पानसरे यांनी शिवाजी आणि अवतार, शिवाजी व भवानी तलवार, भोंदू भक्तांपासून शिवाजीला धोका ,शिवाजी आज असता तर आदी मुद्द्यांची मांडणी केली आहे. समारोपात पानसरे म्हणतात,” सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा ,ज्ञान याबाबतीत ज्यांचं बरं चाललेलं असतं ते आहे ते टिकवायला नुसत्या बळाचा वापर करत नाहीत.नुसत्या दंडुक्याचा ,शस्त्राचा आणि शासनाचा वापर करत नाहीत. विचारांचा वापर करतात. इतिहासाचा वापर करतात.लोकांना असा विचार सांगतात असा विचार पटवतात.तसे तत्त्वज्ञान त्यांच्या गळी मारतात.असा इतिहास त्यांना शिकवतात की, त्यांचे फावते. ज्याचे हाती जे आहे ते त्याच्याकडेच राहायला या विचाराची ,या तत्त्वज्ञानाची खऱ्या, खोट्या, विकृत खोडसाळ इतिहासाची मदत होते. विचार हे अगदी प्रभावी हत्यार आहे. टिकाऊ आहे.बंदुकीपेक्षा श्रेष्ठ आहे.या हत्याऱ्याचा प्रस्थापित वापर करत असतात. पण ज्यांच्या हाती काही आहे ते जसे विचारांचा उपयोग करून आहे ते टिकवतात तसेच त्यांच्या हातचे काढून घ्यायचे असेल तर काढून घेऊन पाहणार्‍यांना सुद्धा विचारांचे हत्यार बळकट करावी लागते. वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही. म्हणून आजच्या रयतेने शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे. त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. इतिहासात टाकाऊ असेल ते टाकले पाहिजे. पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्यासून ते पुढे नेले पाहिजे.शिवाजीच्या इतिहासात, शिवाजीच्या विचारात, व्यवहारात, शिवाजीच्या कार्याच्या प्रेरणात आजही उपयुक्त ठरेल असे बरेच काही आहे. ते नीट समजावून घेतले पाहिजे आणि पुढे नेले पाहिजे.”

कॉ.पानसरे आयुष्यभर जात-पात विरोधी ,धर्मनिरपेक्ष विचार मांडत राहिले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज ,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महामानवांना जाती धर्माच्या चौकटीत बांधु पाहणाऱ्यांना त्यांनी खरा इतिहास काय हे निक्षून सांगितले. कडव्या धर्मांध शक्ती कॉ.पानसरे यांच्या विरोधात होत्या.कारण पानसरे त्यांच्या लबाडीवर आणि दुकानदारी वर हल्लाबोल करत असत. एके ठिकाणी ते म्हणतात,’ विचारांवर आधारलेल्या राजकारणापासून सामान्यांनी दूर जाऊन भावनेच्या आधारावर राजकारणात गुंतून पडावे असे प्रयत्न होत असतात. केवळ भावनांवर आधारलेली चळवळ पुरोगामित्वास सहाय्यभूत होत नाही. भावना स्वाभाविक असतात ,उपयुक्तही ठरू शकतात पण विचारांची जोड नसेल तर प्रचंड हानी करतात असे इतिहास सांगतो. रोजीरोटीचा प्रश्न बिकट बनत असताना त्यापासून लक्ष विचलित करून भावनांच्या आधारे नसलेल्या मुद्द्यांच्या आणि दुय्यम मुद्द्यांच्या चर्चेत गुंतवणे हा सुद्धा डाव असतो.हा कावा प्रस्थापितांचा असतो. त्यांनाच उपकारक ठरतो. प्रतिगाम्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर प्रतिक्रियात्मक कृती करून पुरोगामी शक्ती बलवान होत नाहीत. पुरोगाम्यांनी रोजीरोटीचा प्रश्न लढवूनच जमात वादाचा पराभव होऊ शकतो. मुख्य संघर्ष कोणता आणि दुय्यम संघर्ष कोणता याचे भान ठेवून संघर्ष केले पाहिजेत. कायमचा संघर्ष कोणता आणि तात्पुरता संघर्ष कोणता हे ठरवले पाहिजे. अंतिम ध्येयाकरता करावयाच्या संघर्षासाठीच्या जाणिवा तात्कालिक संघर्षामुळे बोथट होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.”

आजच्या अस्वस्थ वर्तमानात कॉ.पानसरे यांनी सांगितलेला शिवाजी फार महत्त्वाचा आहे .’राजर्षी शाहू वसा आणि वारसा’ या समाजवादी प्रबोधिनीनेच सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत ते म्हणाले होते, ” चांगल्या विचारांखेरीज कुणीही टिकाऊ कार्यकर्ता होत नसतो. आणि कार्याखेरीज नुसता विचार कितीही चांगला असला तरी तो वांझोटा असतो. जयजयकाराच्या गदारोळात विचारांची पीछेहाट होऊ नये. प्रतिमांचे पूजन करताना विचारांचे दफन होत नाही याची दक्षता घ्यावी. प्रतिमा पुजावी. परंतु तेवढेच करून थांबू नये. तर त्या विचारांआधारे कार्य करावे. “पानसरे यांच्या लेखनातील सोपेपणा आणि नेमकेपणा असा होता. प्रबोधनाची प्रक्रिया सातत्यपूर्ण राहण्यात त्यांच्या चिंतनशील लेखनाचे पाठबळ फार मोठे आहे व राहणार आहे. शिवजयंती व कॉ.पानसरे स्मृतीदिनानिमित्त त्यांनी सांगितलेले शिवाजी महाराज म्हणूनच समजून घेणे गरजेचे आहे.

————————————–————

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *